शांतता चर्चेपूर्वी रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले   

कीव : रशियाने सोमवारी रात्री युक्रेनवर १० शाहिद ड्रोन आणि डिकॉय ड्रोन डागले, असे युक्रेनियन हवाई दलाने मंगळवारी सांगितले. रशियाचा या वर्षातील सर्वात लहान ड्रोन हल्ला आहे.दोन्ही देश तुर्कीमध्ये शांतता चर्चेची तयारी करत असताना हे हल्ले करण्यात आले. गुरुवारी इस्तंबूलमध्ये चर्चेसाठी प्रत्यक्ष भेटण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी आवाहन केले होते, परंतु रशियाच्या सरकारने त्यावर थेट प्रतिक्रिया दिली नाही.
 
झेलेन्स्की यांचे सल्लागार मिखाइलो पोडोल्याक यांनी मंगळवारी एका समाज माध्यमातील शोमध्ये सांगितले, की झेलेन्स्की इस्तंबूलमध्ये पुतिन यांच्याशिवाय इतर कोणत्याही रशियन अधिकार्‍यांना भेटणार नाहीत.पोडोल्याक म्हणाले, युरोपीय नेत्यांनीही पुतिन यांच्यावर शांतता प्रयत्नांपासून मागे हटण्याचा आरोप केला आहे. ते त्यांच्या प्रचंड सैन्यासह पुढे जाण्याचा आणि अधिक युक्रेनियन जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. युक्रेनियन आणि पश्चिम युरोपीय नेते ३० दिवसांच्या बिनशर्त युद्धबंदीची मागणी करत होते, परंतु सोमवारी रात्री रशियाने युक्रेनवर १०० हून अधिक ड्रोन हल्ले केले. 
 
पुतिन यांनी गुरुवारी इस्तंबूलमध्ये युक्रेनशी थेट शांतता चर्चेचा प्रस्ताव दिला. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी आग्रह धरला की रशियन शिष्टमंडळ कोणत्याही अटीशिवाय इस्तंबूलमध्ये युक्रेनशी चर्चेत सहभागी होईल.
 

Related Articles